सोलापूर, 2 ऑगस्ट – होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग आणि इंस्ट्रुमेंटेशन लँडिंगची सुविधा पूर्वीपासूनच उपलब्ध होती. यासाठी आवश्यक असलेले पेपी लाईट्स बसवण्यात आले होते. मात्र, मधल्या काळात विमानतळ वापरात नसल्याने ही यंत्रणा खराब झाली आणि नंतर ती काढून टाकण्यात आली, अशी माहिती सोलापूर विकास मंचच्या बैठकीत योगिन गुर्जर यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत मिलिंद भोसले, केतन शहा, सुहास भोसले, नागनाथ माळवदकर, प्रसन्न नाझरे, रेवण आयगोळे, दत्तात्रय अंबुरे, संतोष कांबळे, चक्रपाणी, नागेश लगदिवे, प्रकाश भुतडा, मनोज क्षीरसागर, योगिन गुर्जर आणि जयश्री तासगावकर उपस्थित होते.
केतन शहा यांनी बैठकीत 2016 साली लोकसभेत नागरी उड्डाण राज्यमंत्री यांनी दिलेले लेखी उत्तर सादर केले, ज्यात सोलापुरात नाईट लँडिंग आणि इंस्ट्रुमेंटेशन लँडिंग सुविधा असल्याचे नमूद होते. बैठकीत होटगी रोड विमानतळ, 54 मीटर रस्ता, विजयपूर रोड सर्व्हिस रोड आणि सोलापूरच्या क्रीडा विकासाबाबतही चर्चा झाली.