जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. रविवारी आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले असून, आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून कारवाई सुरू ठेवली आहे.
शनिवारी दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी सकाळी हरिस नावाचा दहशतवादी ठार झाला, तर दुपारी दुसऱ्याला मारण्यात आले. रविवारी तिसरा दहशतवादी ठार झाला. ड्रोनच्या मदतीने दोघांचे मृतदेह जंगलात पडलेले दिसले होते.
हरिस हा पुलवामातील कच्छीपोरा येथील रहिवासी आणि लष्कर-ए-तोयबाचा ‘सी’ श्रेणीतील दहशतवादी होता. तो २४ जून २०२३ रोजी दहशतवादी बनला होता. बैसरन हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जाहीर केलेल्या १४ दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव होते. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८ वाजता अखलच्या जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या ९ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष ऑपरेशन ग्रुप, कुलगाम पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या आतील भागात पळून गेले.