अलीकडेच अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेल करार केला असला तरी बलुच नेते मीर यार बलोच यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून या कराराचा विरोध केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग नसून ऐतिहासिकदृष्ट्या एक सार्वभौम राष्ट्र राहिला आहे, आणि येथील तेल व खनिज संसाधनांवर केवळ बलुच जनतेचा हक्क आहे.
पत्रात मीर यार बलोच यांनी म्हटले की, “जनरल असीम मुनीर यांनी तुम्हाला भूगोलाबाबत चुकीची माहिती दिली आहे. या भागातील तेल आणि खनिजांच्या प्रचंड साठ्यांबाबत तुम्हाला पूर्णपणे दिशाभूल करण्यात आली आहे. बलुचिस्तान विक्रीसाठी नाही आणि आमच्या संसाधनांचे शोषण पाकिस्तान, चीन किंवा इतर कोणत्याही देशाकडून स्वीकारले जाणार नाही.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे पाकिस्तानसोबत तेल करार जाहीर करताना भविष्यात भारतालाही पाकिस्तानकडून तेल खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली होती. या करारामागे भारतावर दबाव आणण्याचा अमेरिकेचा डाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बलुच नेते या कराराला तीव्र विरोध करत असून, ते आधीपासूनच चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग (CPEC) प्रकल्पाच्या विरोधात आहेत. CPEC मुळे स्थानिक बलुच समुदायात अविश्वास वाढला आहे. गेल्या काही वर्षांत या भागात सरकारविरोधी निदर्शने, विरोध चळवळी आणि सशस्त्र संघर्ष तीव्र झाले आहेत.
मीर यार बलोच यांनी ठामपणे सांगितले की, “आमच्या संसाधनांवर अधिकार फक्त बलुच जनतेचा आहे. पंजाब किंवा इस्लामाबादमधील कार्यालयांच्या मर्जीने हे संसाधन विकले जाणार नाहीत.”