महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून, बहुतांश भागांत केवळ हलक्या सरींची नोंद होत आहे. हवामान विभागानुसार, सध्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी असली तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवसांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरात ढगाळ हवामानासह मध्यम पाऊस होऊ शकतो. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि हिंगोली भागांत विजांसह पावसाची शक्यता आहे. सध्या पावसाचा जोर कमी असल्यामुळे काही भागांमध्ये तापमान वाढले असून, नागपूरमध्ये शनिवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची तीव्रता जास्त राहू शकते. नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्यतनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.