श्रीनगर, 3 ऑगस्ट – श्रीनगर विमानतळावर एका लष्करी अधिकाऱ्याने जादा सामानाच्या वादातून स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीमध्ये एका कर्मचाऱ्याचा पाठीचा कणा मोडला असून दुसऱ्याचा जबडा तुटला आहे.
एअरलाइनच्या निवेदनानुसार, घटनेत एक कर्मचारी लोखंडी स्टँडने मारला गेला, तर एक जण बेशुद्ध पडल्यावरही त्याला लाथा मारण्यात आल्या. केबिनमध्ये ७ किलोपेक्षा जास्त सामान ठेवण्याची परवानगी नसल्याचे सांगितल्यानंतर वाद वाढला.
घटनास्थळी उपस्थित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लष्करी अधिकाऱ्याला थांबवले.
भारतीय लष्कराने या घटनेची दखल घेतली असून, चौकशीसाठी नागरी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगितले आहे.