मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबईत दाखल होणार आहे. ती चंदीगडहून मुंबईसाठी निघाली आहे. त्याचवेळी मुंबईत महानगरपालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कंगनाच्या कार्यालयाबाहेरचा स्लॅब अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे. यावर कंगना रनौतने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बाबरची आर्मी असं संबोधलं आहे. तसेच आपलं ऑफिस राम मंदिर असल्याचं म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करत आहेत. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण केलं जाणार आहे.
कंगना रनौतनं ट्वीट करत म्हटलं आहे की, ”मणिकर्णिका फिल्म्ज’मध्ये ‘अयोध्या’ची घोषणा केली होती. ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल, राम मंदिर पुन्हा पडणार. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनणार, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.’
कंगना रनौतने आपल्या ट्वीटची मालिका सुरुच ठेवली आहे. या तोडक कारवाईचे फोटो ट्वीट करुन ‘पाकिस्तान’असं तिने कॅप्शन दिलं आहे. शिवाय #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे. दरम्यान, आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणाऱ्या कंगनाने महापालिकेच्या कारवाईनंतर आता थेट मुंबईला पाकिस्तान असं संबोधलं आहे.
* कारवाईवर महापौरांचा म्हणणे
दरम्यान, कंगनाच्या कार्यालयाच्या बांधकामाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मुदत दिली होती. महापालिका सगळ्यांना वेळ देते. अवैध बांधकामावर कारवाई केली नाही तर तुम्हीच बोलणार. ही कारवाई अवैध बांधकामावरच होत आहे. नियमित बांधकामावर होत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईबाबत दिली.
* कंगनाच्या वकिलाचा आरोप
कंगनाच्या वकिलांनी सांगितलं आहे की, बीएमसी द्वारे ‘स्टॉप वर्क’ अंतर्गत जी नोटीस कंगनाच्या ऑफिसच्या गेटवर लावण्यात आली आहे. ती चुकीची आहे. अवैध्य आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं अवैध्य काम सुरु नव्हतं. मग ‘स्टॉप वर्क’ नोटीस कशाच्या आधारावर देण्यात आलं? कंगनाच्या वकिलांनी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले की, बीएमसीने बंगल्यात बदल केल्याची बाब नोटीसमध्ये दिली आहे. अशातच कायदेशीररित्या कंगनाला 7 दिवसांत जबाब देण्याची नोटीस जारी केली पाहिजे होती. पण बीएमसीने फक्त एक दिवसांत जबाब देण्याची नोटीस जारी केली आहे. हे मुद्दाम कंगनाला त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचंही कंगनाचे वकिल म्हणाले.
* असे आहे अनधिकृत बांधकाम
तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.
* महापालिकेने बजावली होती नोटीस
कंगनाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस लावली. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती. कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.