नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८:४६ वाजता घडली. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, उमेश विष्णु राऊत (राहणार तुलसीबाग रोड, महल, नागपूर) याने स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून १० मिनिटांत गडकरींचे घर उडवून देण्याची धमकी दिली होती. तो मेडिकल चौकाजवळील एका देशी दारूच्या दुकानात काम करत होता. बीमा रुग्णालयाजवळून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
धमकीच्या कॉलनंतर स्थानिक पोलिस ठाणे आणि बॉम्ब शोध पथकाला सतर्क करण्यात आले. गडकरी यांच्या निवासस्थानी कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नाही. त्यामुळे हा कॉल खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
यापूर्वीही गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते. त्या प्रकरणात कर्नाटकमधून उमेश काथा नामक कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली होती. झोन १ चे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी सांगितले की, ११२ इमर्जन्सी हेल्पलाइनवर आलेल्या कॉलमध्ये गडकरींच्या घरात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली होती.
सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, धमकीमागचा हेतू शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.