सामाजिक ऐक्याचा अनोखा आदर्श निर्माण
अमरावती – समाजात समता, सलोखा आणि बंधुतेचा संदेश देणारा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार, ३ ऑगस्ट रोजी दर्यापूर येथील कृषी भवन येथे उत्साहात पार पडला. विविध धर्मीय वधू-वरांनी एकाच मंचावर विवाहबद्ध होत सामाजिक ऐक्याचा अनोखा आदर्श घालून दिला.
हा सोहळा समाजकल्याण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (अमरावती) आणि मणिषा ज्ञानप्रकाश बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार यांनी भूषवले, तर उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या कमलजीत कौर मॅडम यांच्या हस्ते झाले.
विवाह विधी पारंपरिक रितीने व साधेपणाने पार पडले. वधू-वरांच्या धर्मानुसार स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. विवाहानंतर नवविवाहित जोडप्यांना भांडी, गादी, डबे, ब्लँकेट्स आणि इतर आवश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात अमर्दीप सदाशिव, राहुल तायडे, नरेंद्र डोंगरे आणि संदेश कुळखे यांचे विशेष योगदान होते. कार्यक्रमाला दर्यापूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी व्यक्त केले की, “धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन समाजात ऐक्याची भावना वृद्धिंगत करणारा हा विवाह सोहळा प्रेरणादायी उदाहरण आहे.” नागरिकांनी पुढेही अशा उपक्रमांना प्रशासन व सामाजिक संस्थांनी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
