झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक, आदिवासी हक्कांसाठी लढणारे नेते
नवी दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलाने आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावरून दिली.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’वर लिहिले, “आदरणीय दिशोम गुरुजी आम्हा सर्वांना सोडून गेले. आज मी पूर्णपणे रिकामा झालो आहे.”
शिबू सोरेन यांचे आज सकाळी ८:५६ वाजता दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आजारी होते, मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते आणि दीड महिना आधी स्ट्रोक आल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. गेल्या महिन्याभरापासून ते लाइफ सपोर्टवर होते.
झारखंडमध्ये ‘गुरुजी’ म्हणून ओळखले जाणारे शिबू सोरेन आदिवासी हक्कांसाठी लढणाऱ्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक होते. त्यांनी स्वतंत्र झारखंड राज्याच्या चळवळीचे नेतृत्व केले आणि तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. ते आठ वेळा लोकसभेचे व तीन वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले, तसेच केंद्रीय मंत्रीपदही सांभाळले.
त्यांच्या निधनाची बातमी पसरताच झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या जाण्याने झारखंडच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
