नवी दिल्ली – भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील ओव्हल टेस्टच्या चौथ्या दिवसानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी माजी कर्णधार विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती मागे घेण्याचे आवाहन केले.
थरूर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “या मालिकेदरम्यान मला विराट कोहलीची अनेकदा आठवण आली, पण या कसोटी सामन्यात ती सर्वाधिक जाणवली. त्याचा संयम, उत्साह, मैदानावरील प्रेरणादायी उपस्थिती आणि चमकदार फलंदाजीमुळे कदाचित सामना वेगळ्या निकालाकडे गेला असता. विराट, देशाला तुझी गरज आहे.”
इंग्लंड मालिकेपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केले होते. कोहलीने १२३ कसोटी सामन्यांत २१० डाव खेळले असून, ३० शतके आणि ७ द्विशतकांसह एकूण ९,३२० धावा केल्या आहेत.
