श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावाजवळील दाट जंगलात सुरू असलेली दहशतवादविरोधी कारवाई सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले असून, चार जवान जखमी आहेत. जखमींपैकी एकाचा श्रीनगर येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
सुरक्षा दलांनी जंगल परिसर कडेकोट सील करून रुद्र हेलिकॉप्टर, ड्रोन, नाईट व्हिजन उपकरणे आणि मोठ्या प्रमाणात निमलष्करी दल तैनात केले आहे. शनिवारी दोन आणि रविवारी एक अशा तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यापैकी एकाची ओळख पुलवामाच्या हॅरिस नजीर दार अशी झाली असून, तो ‘सी’ श्रेणीतील दहशतवादी होता.
गुप्त माहितीनंतर १ ऑगस्टला सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत गुप्तचर संस्थांच्या यादीतील १४ पैकी सात स्थानिक दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये मे महिन्यात शोपियान आणि पुलवामातील सहा जणांचा समावेश आहे.
२८ जुलै रोजी पहलगाम हल्ल्याचे मास्टरमाइंड आणि दोन साथीदारांना ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत ठार करण्यात आले होते. त्यांची ओळख पाकिस्तानी मतदार ओळखपत्र आणि एका विशिष्ट चॉकलेटच्या ब्रँडवरून पटली होती.
