मुंबई – जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्लाने भारतात अधिकृत प्रवेश करत आज मुंबईतील बँड्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (वन बीकेसी) येथे पहिले चार्जिंग स्टेशन सुरू केले. या केंद्रात आठ चार्जिंग स्टॉल्स असून, चार V4 सुपरचार्जर (डीसी फास्ट चार्जर्स) आणि चार डेस्टिनेशन चार्जर (एसी चार्जर्स) आहेत.
V4 सुपरचार्जरची क्षमता २५० किलोवॅट असून चार्जिंग दर ₹२४ प्रति युनिट आहे. डेस्टिनेशन चार्जर ११ किलोवॅटपर्यंत चार्जिंग देतात आणि दर ₹१४ प्रति युनिट आहे. कंपनीच्या मते, मॉडेल Y एसयूव्ही केवळ १५ मिनिटांत २६७ किमी धावण्याइतकी चार्ज होऊ शकते. चार्जिंग सुरू करणे, स्थिती पाहणे आणि पेमेंट टेस्ला अॅपद्वारे करता येईल.
पहिले ‘टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर’
१५ जुलै रोजी टेस्लाने मुंबईत पहिले ‘एक्सपीरियन्स सेंटर’ सुरू करून मॉडेल Y एसयूव्हीचे अनावरण केले होते. हे दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल —
-
स्टँडर्ड रिअर-व्हील ड्राइव्ह: ₹५९.८९ लाख
-
लाँग-रेंज रिअर-व्हील ड्राइव्ह: ₹६७.८९ लाख
दोन्ही मॉडेल्स शांघाय गिगाफॅक्टरीतून तयार होऊन भारतात आयात केली जातील, आणि वितरण २०२५ च्या तिसऱ्या-चौथ्या तिमाहीपासून सुरू होईल.
आणखी चार्जिंग स्थानके
टेस्ला सप्टेंबर तिमाही अखेरपर्यंत लोअर परळ, ठाणे आणि नवी मुंबई येथे आणखी तीन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची योजना आखत आहे.