सोलापूर – सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, यापूर्वी ऑगस्टमध्ये ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती आणि उर्वरित महिन्यात ती सुरू होईल असा विश्वास आहे.
रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमानंतर सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना गोरे यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने, भाजप जिल्हाध्यक्ष शशीकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील काही प्रमुख नेते भाजपात प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्न विचारला असता गोरे यांनी स्मितहास्य करत “आगे आगे देखो होता है क्या…” असे सूचक उत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून, त्याआधी भाजपकडून मोठ्या पक्षांतराची चिन्हे आहेत.