इस्लामाबाद, ५ ऑगस्ट – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेला आज दोन वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त त्यांच्या पक्षाने देशव्यापी “फ्री इम्रान” आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाने संस्थापक इम्रान खान आणि इतर अटकेत असलेल्या नेत्यांच्या सुटकेसाठी हे आंदोलन छेडले असून, संपूर्ण देशात पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.
PTI नेते असद कैसर यांनी स्पष्ट केले की, ५ ऑगस्टपासून सुरू होणारे हे आंदोलन अंतिम टप्पा नसून, सरकार हटेपर्यंत आंदोलन सुरू राहील. त्यांनी प्रांतीय नेत्यांना रॅली, जनजागृती मोहिमा आणि इतर कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारने कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू केल्याचा आरोप PTI ने केला आहे. अनेक नेत्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले असून, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पंजाब आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये छापेमारी सुरू असून, अनेक जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
रावळपिंडी जिल्हा प्रशासनाने ४ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत सीआरपीसी अंतर्गत कलम १४४ लागू केले आहे. या आदेशानुसार रॅली, मोर्चे, निदर्शने आणि चारपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
अदियाला तुरुंगाचे वरिष्ठ अधीक्षक अब्दुल गफूर अंजुम यांनी सिटी पोलिस अधिकाऱ्याला अतिरिक्त सुरक्षा देण्याची विनंती केली आहे. त्यांनी नमूद केले की, सध्या तुरुंगात ७,७०० कैदी असून, तुरुंगाची क्षमता केवळ २,१७४ आहे. पीटीआय समर्थक जेलबाहेर निदर्शने करू शकतात, त्यामुळे सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
इम्रान खान यांना ५ ऑगस्ट २०२३ रोजी लाहोरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर सरकारी भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप सिद्ध झाल्याने तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पीटीआयने सतत त्यांच्या सुटकेसाठी मागणी करत सरकारवर दबाव टाकला आहे.