नवी दिल्ली, ५ ऑगस्ट – राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या सुरक्षेत मोठी त्रुटी समोर आली असून, बेकायदेशीरपणे परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ७ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, हे पाचही बांगलादेशी नागरिक ४ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या परिसरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हे सर्वजण बांगलादेशचे रहिवासी असून, बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे वय अंदाजे २० ते २५ दरम्यान असून, ते दिल्लीत मजूर म्हणून काम करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून बांगलादेशशी संबंधित काही कागदपत्रे जप्त केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याच्या सुरक्षेतील मोठा दोष समोर आला आहे. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दररोज सुरक्षा कवायती राबवल्या जात असून, याच दरम्यान स्पेशल सेलच्या पथकाने नागरी पोशाखात सुरक्षा व्यवस्थेची चाचणी घेतली. त्यांनी आपल्या बॅगेत डमी बॉम्ब ठेवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश मिळाले. ही सुरक्षेतील गंभीर त्रुटी लक्षात घेता ७ पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.