छत्रपती संभाजीनगर, ५ ऑगस्ट – भारत लवकरच जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था ठरणार असल्याचा विश्वास ऊर्जा आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्री सावे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या अहवालानुसार २०२६ पर्यंत भारताचा विकासदर ६.४ टक्के राहील. त्यामुळे भारताचा आर्थिक विकासदर जगात सर्वोच्च ठरण्याची शक्यता आहे.
या प्रगतीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाला आणि देशहितासाठी घेतलेल्या ठोस निर्णयांना दिले जात आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही भारताने आपली आर्थिक घोडदौड कायम राखली आहे, असे ते म्हणाले.
रोजगार, गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा प्रभाव दर्शवतात. ही आकडेवारी भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि आत्मविश्वासाचा पुरावा असल्याचेही मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.