मुंबई, ५ ऑगस्ट – कबुतरांचे जीव वाचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या तिन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून, यामध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे. त्यामुळे कबूतरखाना अचानक बंद न करता, पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या विषयावर मंत्रालयात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोजगार व कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कबुतरखाना बंद करताना तातडीने पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक आहे. कबुतरांच्या उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून महानगरपालिकेने नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा. नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कबुतरांना कोणत्या वेळेत खाद्य द्यायचे आणि कोणत्या वेळेत नाही, यासंबंधी नियमावली तयार करावी.
मुंबईसारख्या महानगरात कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून तज्ज्ञांच्या मदतीने अहवाल तयार करण्यात यावा. कबुतरांच्या विष्ठेचे व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध तांत्रिक उपायांचा विचार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
कबुतरखान्याशी संबंधित मुद्द्यांवर सध्या उच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात राज्य शासन आणि महापालिकेने न्यायालयात भूमिका मांडावी, तसेच आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयातही आपली बाजू मांडण्याची तयारी ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची आणि त्याची देखभाल करण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली.