सोलापूर, ५ ऑगस्ट – सोलापूर जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून जनावरांमध्ये लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. संसर्गजन्य स्वरूपाच्या या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधीतून १५ लाख रुपयांची लस खरेदी केली असून, लसीकरण वेगाने सुरू असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
गेल्या महिन्यात जिल्ह्यात १५४४ गायवर्गीय जनावरे लंम्पीमुळे बाधित झाली होती, त्यापैकी ११०८ जनावरे बरी झाली असून ३३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४०३ जनावरांवर उपचार सुरू आहेत.
जंगम यांनी पशुपालकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण तात्काळ करून घ्यावे. तसेच गोठ्यांची आणि जनावरांची नियमित स्वच्छता राखावी, जेणेकरून संसर्गाचा प्रसार रोखता येईल. पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेण्याचंही त्यांनी सुचवलं आहे.