दुबई, ७ ऑगस्ट – भारतीय कसोटी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) जुलै महिन्याच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारासाठी त्याची स्पर्धा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू वियान मुल्डर यांच्याशी आहे.
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत गिलने आघाडीवर राहून नेतृत्व केले आणि दमदार फलंदाजीसह अनेक विक्रम प्रस्थापित केले. मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी साधली. गिलने मालिकेत ७५.४० च्या सरासरीने ७५४ धावा फटकावत चार शतके आणि एक द्विशतक झळकावले. या कामगिरीद्वारे त्याने सुनील गावस्कर यांचा एका मालिकेत भारतीय कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक ७३२ धावांचा विक्रम मोडला. आता कर्णधार म्हणून एका मालिकेतील धावसंख्येच्या बाबतीत गिलचा क्रमांक सर डोनाल्ड ब्रॅडमननंतर दुसरा आहे.
आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “गिलसाठी हा महिना अत्यंत यशस्वी ठरला. इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांत त्याने ९४.५० च्या सरासरीने ५६७ धावा केल्या. एजबॅस्टनच्या कसोटीत त्याच्या २६९ आणि १६१ धावांच्या खेळीने भारताचा विजय सुनिश्चित झाला. एका कसोटीत एकूण ४३० धावा करून त्याने ग्रॅहम गूचच्या ४५६ धावांनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च कामगिरी केली.”