डेहराडून, ७ ऑगस्ट – उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली आणि हर्षिल परिसरात ढगफुटी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीही गुरुवारी सकाळपासून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज सकाळी उत्तरकाशीमध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन धारली परिसरातील मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी हेली बचावकार्य अधिक प्रभावी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर सांगितले की, “आज सकाळपासून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रवास मार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे अडकलेल्या नागरिकांना उत्तरकाशीतील माटली हेलीपॅडवर सुरक्षितपणे आणले जात आहे.” त्यांनी बचावकार्यात सहभागी पथकांच्या धाडसाचे आणि समर्पणाचे कौतुक करताना म्हटले की, प्रतिकूल परिस्थितीतही ही पथके आपत्ती व्यवस्थापनातील निष्ठेचे आणि कार्यक्षमतेचे अनुकरणीय उदाहरण सादर करत आहेत.
या कारवाईदरम्यान आतापर्यंत अनेक नागरिकांना वाचवण्यात आले आहे. गुरुवारी ४३ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी बहुतेक यात्रेकरू आहेत. महाराष्ट्रातील जळगावच्या अनामिका मेहरा यांनी त्यांच्या कुटुंबाला वाचवल्याबद्दल सरकारचे आभार मानले.
दरम्यान, माटली आणि हर्षिल दरम्यान शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. युकेएडीएच्या ८ हेलिकॉप्टर्सद्वारे सतत शॉर्टी ऑपरेशन्स सुरू आहेत. मदत कार्यासाठी राजपुताना रायफल्सचे १५० जवान, आयटीबीपीचे १०० कर्मचारी तसेच एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत. आरोग्य विभागाचे पथके घटनास्थळी वैद्यकीय सेवा पुरवत असून, डेहराडून, कोरोनेशन आणि एम्स ऋषिकेशमध्ये आयसीयू आणि जनरल बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
एसडीआरएफचे पोलीस महानिरीक्षक अरुण मोहन जोशी यांनी सांगितले की, सर्व संस्था समन्वयाने काम करत असून, प्रत्येक बाधित नागरिकापर्यंत पोहोचणे व जनजीवन पूर्ववत करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
दरम्यान, उत्तराखंडच्या इतर भागांमध्येही सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पर्वतरांगांपासून मैदानापर्यंत अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पौडी गढवाल, चमोली, हरिद्वार, रुद्रप्रयाग इत्यादी जिल्ह्यांमध्ये रस्ते खचले आहेत आणि काही ठिकाणी जीवित व वित्तहानीही झाली आहे.