नवी दिल्ली, ७ ऑगस्ट –
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारताची थट्टा करत आहेत, आणि आपण त्यांना उत्तरही देऊ शकत नाही, अशी तीव्र टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री प्रचारासाठी फिरत असून, देशाचा कारभार कोणी चालवतंय हेच समजत नाही, असेही ते म्हणाले.
दिल्ली दौर्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत परराष्ट्र नीतीतील अपयश, निवडणूक यंत्रणेतील पारदर्शकतेचा अभाव आणि भाजप नेत्यांची प्रचारमंत्री म्हणून वर्तणूक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवर टीका
ठाकरे म्हणाले, “ईव्हीएमवर संशय असताना व्हीव्हीपॅट आणली, पण तरीही मतदारांना स्वतःचं मत कळत नाही. बॅलेट पेपरवर ठसा द्यायचा, तेव्हा मत स्पष्ट दिसायचं. आता तेच नाही. मग निवडणुका का घेतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एनआरसीचा अप्रत्यक्ष उल्लेख
बिहारमधील मतदार यादीतील गोंधळ आणि मतदारांनी स्वतःची ओळख पटवण्याची अट याकडे लक्ष वेधत ठाकरे म्हणाले, “देशात अघोषित एनआरसी लागू झाली आहे का?” अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं.
इंडी आघाडी, राज ठाकरेसोबत संभाव्यता
राहुल गांधींच्या निमंत्रणानंतर इंडी आघाडीतील स्नेहभोजनात सामील होणार असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा होऊ शकते, असे ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्यासोबत तब्बल दोन दशकांनंतर ते एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सूचकपणे सांगितले, “जे करायचं ते आम्ही करु. तिसऱ्याची गरज नाही.”
भारत-पाकिस्तान संबंधावर टीका
पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच खेळू नये हे आमचे स्पष्ट मत आहे, असे सांगत त्यांनी भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. “जय शहासकट अनेक मंत्र्यांची मुलं दुबईत पाकिस्तानची मॅच पाहत आहेत. हे देशभक्त असू शकत नाहीत,” असा घणाघात ठाकरे यांनी केला.
शिंदेंवर हल्लाबोल
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यावर ठाकरे म्हणाले, “शिंदे आपल्या मालकांना भेटायला गेले होते,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.