बंगळुरू, ७ ऑगस्ट –
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अपारदर्शकता आणि गोंधळावर केलेल्या आरोपांवर कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी कारवाईचा पुढचा टप्पा सुरू केला आहे. त्यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवून, मतदार यादीतील अपात्र व्यक्तींचा समावेश आणि पात्र मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांबाबत अधिकृत शपथपत्र सादर करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात सीईओ कार्यालयाने राहुल गांधी आणि काँग्रेस शिष्टमंडळाला ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत भेटीची वेळ निश्चित केली आहे. काँग्रेस शिष्टमंडळाने याच तारखेला निवेदन देण्याची विनंती केली होती.
निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, मतदार यादी जनप्रतिनिधित्व अधिनियम, 1950; मतदार नोंदणी नियम, 1960; तसेच आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शकपणे तयार केली गेली आहे. आयोगाने हा मुद्दा पूर्णतः नियमबद्ध प्रक्रियेत हाताळला असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रात सांगण्यात आले आहे की, नोव्हेंबर २०२४ मध्ये मसुदा यादी आणि जानेवारी २०२५ मध्ये अंतिम मतदार यादी काँग्रेसला दिली गेली होती, परंतु काँग्रेसने कोणतीही अधिकृत तक्रार सादर केली नव्हती.
राहुल गांधी यांनी मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आल्याचा आरोप करत असताना, सीईओंनी त्यांना विनंती केली आहे की, ज्यांची नावे वगळली गेली किंवा चुकीच्या नावांचा समावेश झाला, त्यांची यादी शपथपत्राच्या स्वरूपात, पार्ट क्रमांक व अनुक्रमांकासह सादर करावी, तसेच माहिती खरी असल्याची हमीही द्यावी. चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या मतांची चोरी झाल्याच्या आरोपांना “भ्रामक, तथ्यहीन आणि धमकावणारे” असे ठरवत पूर्णपणे फेटाळले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक निकाल फक्त उच्च न्यायालयात याचिकेद्वारेच आव्हान दिले जाऊ शकते.