लंडन, 8 ऑगस्ट – इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला यूके पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून पासपोर्ट जप्त करण्यात आला असून, जामिनावर सुटका झाल्यानंतरही तपास पूर्ण होईपर्यंत तो देश सोडू शकणार नाही. या घटनेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्याला निलंबित केले आहे.
ग्रेटर मँचेस्टर पोलिसांच्या माहितीनुसार, २३ जुलै २०२५ रोजी मँचेस्टर परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी २४ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. पाकिस्तानी वंशाच्या एका तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हैदर अलीला बेकहॅम ग्राउंडवर वनडे सामना सुरू असताना अटक करण्यात आली. पाकिस्तानी शाहीन संघाचा इंग्लंड दौरा २७ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान पार पडला.
पीसीबी प्रवक्त्याने सांगितले की, चौकशी पूर्ण होईपर्यंत हैदर अलीला निलंबित करण्यात आले असून, बोर्ड यूकेमध्ये स्वतंत्र तपास करेल आणि आवश्यक तेथे कायदेशीर मदत पुरवेल. हैदर अली पाकिस्तान ए संघासोबत इंग्लंड लायन्सविरुद्ध सामने खेळत होता.
हैदर अलीने पाकिस्तानसाठी २ वनडे आणि ३५ टी२० सामने खेळले आहेत. टी२० मध्ये त्याने ५०५ धावा (३ अर्धशतकांसह) १२४ स्ट्राइक रेटने केल्या आहेत. २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याचा शेवटचा टी२० सामना झाला होता. या प्रकरणामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन कठीण होण्याची शक्यता आहे.