मुंबई, 8 ऑगस्ट – दिल्लीतील इंडी आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने आज प्रतिकात्मक आंदोलन केले. ‘काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा’ अशा घोषणांसह शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आंदोलन केले. या वेळी ‘बाळासाहेब उबाठाला माफ करा’ आणि ‘सडका मेंदू साफ करा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात आमदार डॉ. मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या सुशीबेन शहा, महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले. डॉ. कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील स्थितीवर टीका करत, “शेवटच्या रांगेत बसलेले उबाठा बाळासाहेबांना आवडले नसते, म्हणून आम्ही त्यांची माफी मागायला आलो” असे सांगितले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे जात असून जनता त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला.
प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही कठोर शब्दांत ठाकरे यांच्यावर टीका केली. “उबाठा सेना सोनिया गांधी यांच्या पायाशी ठेवली. शिवसेना-भाजप युतीच्या काळात अमित शहा मातोश्रीवर आले होते, पण आता तुम्ही उंदरासारखे कुठेही बसता,” अशी टिप्पणी त्यांनी केली.