सोलापूर, 8 ऑगस्ट : सोलापूर महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू केली आहे. नोटीस देऊनही थकबाकी न भरणाऱ्या मिळकतदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचा निर्णय महापालिकेच्या नियुक्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. सध्या 191 थकबाकीदारांच्या सातबारांवर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू असून, 17 मालमत्ता विक्रीसाठी हालचाली सुरू आहेत.
शहर आणि हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असल्याने महापालिकेचा महसूल बुडत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने एक हजार मिळकतदारांची यादी तयार केली. त्यापैकी 191 थकबाकीदारांची नावे बोजा चढवण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. या सर्वांना अंतिम आठ दिवसांची मुदत देणारी नोटीस पाठवली जाणार आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर महापालिकेचा बोजा चढवला जाईल.