सोलापूर, 9 ऑगस्ट –
आमदार गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्यातील कार्यकर्त्यांमधील वैमनस्यातून सोलापूरात शरणू हांडे याचे अपहरण झाल्याची घटना घडली. पोलीसांच्या तत्पर कारवाईत केवळ चार तासांत अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक व रोहित पवारांचे कट्टर कार्यकर्ते अमित सुरवसे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करून निषेध नोंदवला होता. त्यानंतर मे 2025 मध्ये पडळकर समर्थक शरणू हांडे यांनी अमित सुरवसे यांना बेदम मारहाण करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते. यामुळे दोन्ही गटांतील वैर अधिकच तीव्र झाले.
शुक्रवारी झालेल्या अपहरणात एमएच 12 एक्सएक्स 6547 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी वाहनासह दोन कोयते, लोखंडी साहित्यासह साडी, फटाक्यांची माळ, कंडोम आणि ट्रायपॉड असा संशयास्पद माल जप्त केला. या साहित्याचा नेमका उद्देश काय होता, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 5 ते 10 मिनिटे उशीर झाला असता तर शरणू हांडे यांचा जीव धोक्यात आला असता. मात्र, वेळेत पोहोचलेल्या पोलिसांनी त्यांचा जीव वाचवला. विष्णू हांडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अमित सुरवसे (29), सुनील पुजारी (20), दीपक मेश्राम (23) आणि अभिषेक माने (23) यांना अटक करून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.