रांची, 9 ऑगस्ट –
झारखंडच्या सेराईकेला खरसावन जिल्ह्यातील चांडिल येथे दोन मालगाड्या समोरासमोर धडकल्याची गंभीर घटना घडली. चांडिल रेल्वे स्थानकापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील खांब क्रमांक ३७५/२२ जवळ हा अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही गाड्यांचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि इंजिनचे मोठे नुकसान झाले. परिणामी अप व डाउन दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
एक मालगाडी टाटानगरहून बोकारोला जात होती, तर दुसरी बोकारोहून टाटानगरला येत होती. प्राथमिक तपासात सिग्नलिंग सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आहे. टक्कर झाल्यानंतर झालेल्या मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेनंतर आग्नेय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, अपघात निवारण ट्रेन आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. काही कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अवजड यंत्रांच्या मदतीने रुळांवरील ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे चांडिल-टाटानगर आणि चांडिल-बोकारो मार्गावरील सर्व प्रवासी व मालगाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या वळवण्यात किंवा कमी करण्यात आल्या आहेत. स्थानकांवरील प्रवाशांना हेल्पडेस्क व घोषणांद्वारे माहिती पुरवली जात आहे. ट्रॅक पूर्ववत होण्यासाठी २४ तासांहून अधिक वेळ लागू शकतो. प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून मालवाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.