सिंधुदुर्ग, 11 ऑगस्ट –
विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळील व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू लाटांच्या तीव्र मारामुळे ढासळली आहे. त्यामुळे पावसाळ्यात किल्ल्याच्या तटबंदीची पडझड सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.
पावसाळ्यात समुद्राला उधान आल्याने लाटांचा वेग वाढतो. याच दरम्यान रात्रीच्या वेळेस व्यंकट बुरुजाचा समुद्राकडील भाग कोसळला. विजयदुर्ग किल्ला खडकाळ द्वीपकल्पावर बांधलेला असून, तीन बाजूंनी खोल पाण्याचे व नैसर्गिक खडकांचे संरक्षण मिळते. पूर्वी लाटांचा थेट तटबंदीवर होणारा आघात टाळण्यासाठी तिरक्या उताराची खडकांची मांडणी करण्यात आली होती, ज्यामुळे लाटांची ऊर्जा कमी होऊन ती परत समुद्राकडे वळवली जात होती.
मात्र कालांतराने निसर्गातील बदलांमुळे ही रचना कमकुवत झाली आणि आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नाही. तज्ज्ञांच्या मते, काँक्रीटच्या ‘ट्रायपॉड’ संरचनेद्वारे हा मारा रोखता येऊ शकतो. आता किल्ला युनेस्कोच्या ताब्यात गेल्याने तटबंद्यांच्या पुनर्बांधणीसाठी आणि किल्ल्याच्या पुनरुत्थानासाठी पावले उचलली जातील, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.