मुंबई, 11 ऑगस्ट –
टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय (वनडे) करिअरबाबत चर्चा सुरू असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) याबाबत घाईने निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑगस्टमधील बांगलादेश दौरा पुढे ढकलला असल्याने 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी भारतीय संघ कोणतीही वनडे मालिका खेळणार नाही. कोहली आणि रोहित यांनी एकत्रितपणे 83 शतके आणि 25,000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकावेळी रोहित 40 वर्षांचा आणि कोहली 39 वर्षांचा असेल, त्यामुळे तेव्हापर्यंत त्यांचे स्थान टिकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
जर दोन्ही खेळाडूंच्या मनात काही निर्णय असेल तर इंग्लंड दौऱ्यापूर्वीप्रमाणेच ते बीसीसीआय अधिकाऱ्यांना कळवतील, अशी अपेक्षा आहे. सध्या बीसीसीआयचे लक्ष फेब्रुवारीतील टी-20 विश्वचषक आणि त्यासंबंधी तयारीवर आहे, तसेच आशिया कप टी-20 स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ पाठवण्यावर भर आहे.
विराट कोहली सध्या लंडनमध्ये असून, अलीकडेच त्याने इनडोअर नेट सेशनमधील सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. रोहित शर्मा आयपीएलनंतर सुट्टीसाठी इंग्लंडला गेला होता आणि नुकताच मुंबईत परतला आहे. तो लवकरच सराव सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.