गाझा सिटी, 11 ऑगस्ट –
इस्रायली हल्ल्यात गाझाच्या अल शिफा रुग्णालयात किमान पाच पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. हे पत्रकार रुग्णालयाबाहेरील पत्रकार तंबूत राहत होते. या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. इस्रायली सैन्याने हल्ल्यानंतर मान्य केले की त्यांनी प्रसिद्ध पत्रकार अनस अल-शरीफ यांना लक्ष्य केले होते.
मृतांमध्ये अनस अल-शरीफ, मोहम्मद कारीकेह, कॅमेरामन इब्राहिम झहीर, मोआमेन अलिवा आणि मोहम्मद नौफल यांचा समावेश आहे. इस्रायली सैन्याने अनसला हमासमधील दहशतवादी सेलचा प्रमुख म्हणून वर्णन केले आणि दावा केला की तो इस्रायली नागरिक व सैनिकांवर रॉकेट हल्ल्यांचे नियोजन करीत होता.
गाझातील सर्वात प्रसिद्ध पत्रकारांपैकी एक असलेल्या 28 वर्षीय अनसने मृत्यूपूर्वीच इस्रायली बॉम्बहल्ल्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला होता. त्याच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले होते, “सतत बॉम्बहल्ला सुरू आहे, गेल्या दोन तासांपासून गाझा शहरावर इस्रायली हल्ला तीव्र झाला आहे.”
गेल्या २२ महिन्यांच्या युद्धात गाझामध्ये जवळपास २०० माध्यम कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनसच्या मृत्यूनंतर कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स (सीपीजे) ने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सीपीजेच्या संचालिका सारा कुदाह यांनी सांगितले की, कोणत्याही पुराव्याशिवाय पत्रकारांना दहशतवादी म्हणून लेबल लावल्याने इस्रायलच्या हेतू आणि प्रेस स्वातंत्र्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यांनी ठामपणे सांगितले की, पत्रकार हे नागरिक आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जाऊ नये; जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
पॅलेस्टिनी पत्रकार संघानेही या हल्ल्याला ‘रक्तरंजित गुन्हा’ म्हटले आहे आणि त्याचा निषेध केला आहे. दरम्यान, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा सिटी ताब्यात घेण्याच्या योजनेचे समर्थन करताना, हा युद्ध संपवण्याचा सर्वात सोपा मार्ग असल्याचे सांगितले.