कोल्हापूर, 11 ऑगस्ट –
कोल्हापूर शहर आणि उपनगरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप व महायुती कटिबद्ध असून, विकासकामे मार्गी लावण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून सत्ता द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
आमदार अमल महाडिक यांच्या १५ लाख रुपयांच्या विकास निधीतून, तसेच भाजप मंडल कोषाध्यक्ष सुनील वाडकर यांच्या प्रयत्नांतून हस्तीनापूर नगरी येथे सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय आजगेकर होते.
यावेळी खासदार महाडिक म्हणाले की, आमदार अमल महाडिक यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. केंद्रात भाजप आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध होत आहे. कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते कॉंक्रीटचे करण्यासह उपनगरांना मूलभूत सुविधा पुरवून सर्वांगीण विकास साधला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, “सगळे मीच करतो” असा दावा करणाऱ्यांनी पाईपलाईन योजनेच्या पाण्यात अंघोळ केली, मात्र आजतागायत कोल्हापूरला हे पाणी मिळालेले नाही. कांग्रेस अजूनही “सडक, बिजली और पानी” ही जुनी घोषणा वापरत आहे, परंतु भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवले आहे