वॉशिंग्टन, 12 ऑगस्ट – पाकिस्तानी सैन्य प्रमुख आसिम मुनीर यांच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीवजा वक्तव्यावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पेंटगॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी पाकिस्तानची भूमिका अस्वीकार्य ठरवत त्याला ‘दहशतवादी देश’ घोषित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
रुबिन म्हणाले की, अमेरिकेच्या भूमीवर पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अशा धमक्या पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. यामुळे पाकिस्तान ‘जबाबदार देश’ राहण्यास पात्र आहे का, की त्याचा अंत करण्याची वेळ आली आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. आसिम मुनीर यांची भाषा ओसामा बिन लादेनच्या भाषणांची आठवण करून देते, असेही ते म्हणाले.
त्यांनी पाकिस्तानचा ‘प्रमुख गैर-नाटो सहयोगी’ दर्जा तात्काळ काढून घेऊन त्याला ‘दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या देशांच्या यादीत’ समाविष्ट करण्याची मागणी केली. रुबिन यांच्या मते, पाकिस्तान हा असा पहिला गैर-नाटो सहयोगी देश ठरेल, ज्याला दहशतवाद पुरस्कृत देश म्हणून सूचीबद्ध केले जाईल. तसेच, पाकिस्तानने अमेरिकेच्या सेंट्रल कमांडमधून वगळले जावे, अशीही त्यांची मागणी आहे.
रुबिन यांनी प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा आसिम मुनीर यांनी अमेरिकेतच अशी धमकी दिली, तेव्हा अमेरिकन जनरल्सनी बैठकीतून वॉकआऊट का केला नाही? हा गंभीर मुद्दा असल्याने ज्यांनी असे केले नाही, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. पाकिस्तानने या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण आणि माफी मागेपर्यंत आसिम मुनीर व इतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांना ‘पर्सोना नॉन ग्रेटा’ घोषित करून अमेरिकेचा व्हिसा नाकारावा, अशी मागणीही त्यांनी केली.