वॉशिंग्टन, 12 ऑगस्ट – अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि तिच्याशी संलग्न मजीद ब्रिगेडला ‘विदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. बीएलए, ज्याला मजीद ब्रिगेड म्हणूनही ओळखले जाते, गेल्या अनेक दशकांपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढत आहे.
परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मजीद ब्रिगेडला ‘फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन’ यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी 2019 मध्ये बीएलएला ‘स्पेशली डिझिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट’ यादीत समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर बीएलएने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. 2024 मध्ये कराची विमानतळ आणि ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्सजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यांचे दावेही या संघटनेने केले होते.
निवेदनात मार्च महिन्यातील ‘जाफर एक्सप्रेस’ अपहरण प्रकरणाचाही उल्लेख आहे. क्वेटाहून पेशावरकडे जात असलेल्या या ट्रेनचे अपहरण करून 300 प्रवाशांना बंदी बनवण्यात आले होते. या घटनेत सामान्य नागरिक आणि सुरक्षाकर्मचाऱ्यांसह 31 जणांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले की, ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय दहशतवादाविरोधातील लढाईतील कटिबद्धतेचे द्योतक आहे. कोणत्याही संघटनेला दहशतवादी यादीत समाविष्ट करणे म्हणजे अमेरिकेची या संकटाविरुद्धची गंभीर भूमिका आणि दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या मदतीचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न दर्शवतो. हा निर्णय ‘इमिग्रेशन अँड नॅशनलिटी ॲक्ट’च्या सेक्शन 2029 अंतर्गत घेण्यात आला आहे.