पुणे, 12 ऑगस्ट – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मतचोरीविरोधात “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” ही स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेतून सुरू झाली असून प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, नसीम खान, सुप्रिया श्रीनेत आणि डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वाक्षऱ्या करून तिचा शुभारंभ केला.
कार्यशाळेत सोशल मीडियावरील प्रभावी वापराबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्रातील मतदारसंख्या वाढ व मतचोरीच्या आरोपांबाबत आकडेवारीसह माहिती दिली आणि राहुल गांधींच्या या विषयावरील भूमिका अधोरेखित केल्या. सध्याच्या परिस्थितीत प्रसारमाध्यमांमध्ये कमी प्रसिद्धी मिळत असल्याने सोशल मीडिया हेच प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी “गांधी, नेहरू व आंबेडकर” या विषयावर व्याख्यान देत काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक विचार आणि चळवळ असल्याचे सांगितले. त्यांनी मतदार यादीतील घोळ, लोकशाहीवरील आघात आणि काँग्रेसची ऐतिहासिक भूमिका यावर भाष्य केले. तसेच काँग्रेस सत्तेत नसतानाही हा काळ पक्षासाठी महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले.