नवी दिल्ली, 12 ऑगस्ट – दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्प केंद्राचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी दिल्लीत झाला. या केंद्रामार्फत दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जळगाव आणि पुण्यानंतर हा प्रकल्प आता राष्ट्रीय राजधानीत सुरू झाला आहे. उद्घाटन सोहळा कस्तूरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात पार पडला.
मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते, तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, दिव्यांगजन कल्याण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक-संचालक यजुर्वेंद्र महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकरही उपस्थित होते.
राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या दशकात दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे कार्य झाले आहे. स्वयंसेवी संस्था, सरकारी विभाग आणि खासगी क्षेत्रातील सकारात्मक बदलामुळे सामाजिक संवेदनशीलता वाढली आहे.
यजुर्वेंद्र महाजन यांनी स्पष्ट केले की, पुढील 25 वर्षांत कोणताही दिव्यांग किंवा ट्रान्सजेंडर विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल. सध्या केवळ 0.02% दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. दीपस्तंभ संस्था स्वतंत्र भारताच्या शताब्दी वर्षापर्यंत या समुदायांना सर्व क्षेत्रांत अग्रस्थानी आणण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे.
कार्यक्रमात यूपीएससीसह विविध परीक्षांत यशस्वी झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये मनू गर्ग (आयएएस), रवि राज (आयआरएस), अश्विनी परकाळे (आयपीओएस), श्रीतेज पटेल (आयआरएमएस), संपदा वांगे, पुनीत गुप्ता (आयआयएम उदयपूर), तुषार चौगुले (एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर), कविता देसले (एमपीएससी), राकेश गुहा (बँक), विशाल शेलार (सायकलिंग सुवर्णपदक), वीणा (पीएसआय) आणि प्रतीक जिंदाल (आयडीबीआय बँक) यांचा समावेश होता.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांचा सत्कार झाला. विशेष आकर्षण ठरली विद्यार्थिनी माऊली आडकर हिची हारमोनियमवरील ‘सारे जहाँ से अच्छा’ ही प्रस्तुती, जी तिने दोन्ही हातांच्या विकलांगतेवर मात करून सादर केली.