मुंबई, 12 ऑगस्ट – महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार पदांच्या भरतीस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गृह विभागाने मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लवकरच जाहिरात काढून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात किती पदांची भरती होणार याचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. राज्यातील हजारो तरुणांच्या अपेक्षांना या निर्णयामुळे गती मिळाली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात पोलीस भरतीसह – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ, सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding देण्याचा निर्णय, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध कर्ज योजनांमधील जामीनदार अटी शिथिल करून शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय यांचा समावेश आहे.
गेल्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलाने २०२२-२०२३ मधील १७,४७१ शिपायांच्या रिक्त पदांपैकी सुमारे ७०% भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. १९ जून २०२४ पासून मैदानी आणि कौशल्य चाचण्या, तसेच लेखी परीक्षा घेण्यात आली. यातून ११,९५६ उमेदवारांची निवड होऊन नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीत पोलीस शिपाई ९,५९५, चालक पोलीस शिपाई १,६८६, बॅण्डस्मन ४१, सशस्त्र पोलीस शिपाई ४,३४९ आणि कारागृह शिपाई १,८०० पदांचा समावेश होता. या पदांसाठी १६ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते.