नवी दिल्ली, 12 ऑगस्ट – भारतीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने चीनच्या ग्रँडमास्टर लेई टिंगजीचा १०-३ असा पराभव करून महिला स्पीड बुद्धिबळ अजिंक्यपद २०२५ च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. १९ वर्षीय दिव्याने पहिल्याच फेरीपासून आघाडी घेत वर्चस्व गाजवत शानदार विजय नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना तीन वेळा विश्वविजेत्या आणि चिनी ग्रँडमास्टर हौ यिफानशी होणार असून हा सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे.
दरम्यान, भारताची आणखी एक बुद्धिबळपटू आर. वैशाली आधीच स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तिला गेल्या आठवड्यात अमेरिकन आयएम ऍलिस लीकडून ६-८ असा पराभव स्वीकारावा लागला होता. महिला स्पीड बुद्धिबळ अजिंक्यपद ही ऑनलाइन नॉकआउट स्पर्धा असून यात १६ बुद्धिबळपटू सहभागी आहेत. यामध्ये आठ पात्रता फेरीतील आणि आठ थेट आमंत्रित खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ७५,००० अमेरिकन डॉलर्स असून विजेत्याला ७,००० डॉलर्स मिळणार आहेत.