सोलापूर, 12 ऑगस्ट – दहिटणे येथे बांधकाम कामगारांसाठी उभारलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता. १७) सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी त्यांचा सोलापूर शहरातील हा पहिला दौरा आहे. काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शहर उत्तर मतदारसंघातील दहिटणे येथे असंघटित बांधकाम कामगारांसाठी १२५ कोटी रुपयांचा पाच हजार सदनिकांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १,२०० सदनिका पूर्ण झाल्या असून त्यांचा हस्तांतर समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपकडून शक्तिप्रदर्शनाची शक्यताही व्यक्त केली जात आहे.