सोलापूर, 12 ऑगस्ट – महापालिकेच्या ‘माय सोलापूर’ ॲपवर नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा न केल्यामुळे आठ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवत त्यांच्यावर एकूण ८ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या आदेशानुसार झाली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यापूर्वीच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुदतीत तक्रारींचा निपटारा न केल्यास दंड करण्याचे आदेश दिले होते. तक्रारींचा आढावा घेतल्यावर आठ कर्मचाऱ्यांच्या विभागाशी संबंधित तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याचे आढळून आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.