सोलापूर, 12 ऑगस्ट – मागील गाळप हंगाम संपून सहा महिने उलटूनही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत एफआरपी मिळालेली नाही. आगामी ऊस हंगाम अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना शेतकरी प्रतीक्षेत आहेत. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर जिल्हा राज्यात सर्वाधिक थकीत एफआरपी असलेला जिल्हा ठरला आहे.
मागील हंगामात राज्यातील २०० कारखान्यांनी ८५५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून २४ हजार ५११ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. तरीही जुलैअखेर ६० कारखान्यांकडे ३८७ कोटी रुपये थकीत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा पहिल्या, अहमदनगर दुसऱ्या आणि कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ३३ कारखान्यांनी मागील हंगामात एक कोटी चार लाख ७६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८८ लाख २८ हजार ७७६ क्विंटल साखर उत्पादन केले. या गाळपातून २ हजार ७१६ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असले तरी, नऊ कारखान्यांकडे अजूनही ८१ कोटी रुपये थकीत आहेत.