छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट – मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित वारकरी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ उपस्थित राहिले. वारकरी परंपरेचे प्रतीक असलेल्या फेट्याने झालेल्या स्वागताने ते भावूक झाले.
उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीतील प्रत्येक दिंडीला ₹२०,००० अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा असून, त्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारण्याचा मान शिरसाठ यांना मिळाला.
वारकरी संप्रदाय ही दया, क्षमा, प्रेम, समता आणि अध्यात्मिक उन्नतीची चळवळ असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या शिकवणीमुळे समाज एकत्र येतो, असे त्यांनी सांगितले. तसेच शासन वारकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील, ही ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री प्रकाश आप्पा आवाडे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल (काकाजी) पाटील, ह.भ.प. माधव शिवणीकर, ह.भ.प. नरहरीबुवा चौधरी, ह.भ.प. निवृत्ती नामदास, ह.भ.प. श्रीकांत हुलवान तसेच वारकरी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.