मुंबई, 13 ऑगस्ट – 11 ऑगस्ट 2012 रोजी मुंबईतील आझाद मैदानात घडलेली दंगल हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय मानला जातो. ‘अमर जवान ज्योती’ची विटंबना, पोलीस व प्रसारमाध्यमांच्या गाड्यांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि महिला पोलीस व पत्रकारांवर हल्ले अशा गंभीर घटना या दंगलीत घडल्या. काही कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचे मानले जात असून, प्रशासनाने ती केवळ ₹36.44 लाख दाखवली आहे. आरोपींकडे मालमत्ता नसल्याचे कारण देत वसुली थांबवणे धक्कादायक असल्याची टीका हिंदु जनजागृती समितीने केली.
समितीने मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांना दिलेल्या निवेदनात, आरोपींवर दिवाणी दावे दाखल करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी आणि कार्यक्रमातील मुख्य आयोजक रझा अकादमीकडून हानीभरपाई वसूल करावी, अशी मागणी केली. हीच मागणी केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडेही करण्यात आली आहे.
समितीने निदर्शनास आणून दिले की, दंगलीदरम्यान जखमी झालेले पोलीस शिपाई संतोष हांडे यांचा पुढील वर्षी मृत्यू झाला होता. त्यामुळे रझा अकादमी आणि तिच्या सहयोगी संघटनांवर भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला पाहिजे होता. 60 आरोपींपैकी अनेक जण सध्या पत्त्यावर उपलब्ध नाहीत किंवा मालमत्ता इतरांच्या नावावर दाखवून वसुली टाळली गेली आहे. तसेच महिला पोलिसांवरील अत्याचार प्रकरणांची सुनावणी तातडीने घेऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणीही समितीने केली.
समितीचा आरोप आहे की, तत्कालीन काँग्रेस सरकारने मुस्लिम मतांसाठी रमजान ईदच्या काळात कारवाई टाळली होती. आता तरी पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी राजकीय फायद्या-तोट्याच्या पलिकडे जाऊन कठोर पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले.