सियोल, 13 ऑगस्ट – दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या पत्नी किम केओन यांना शेअर बाजारातील फसवणूक, लाचखोरी आणि इतर अनेक आरोपांमुळे अटक करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी माजी फर्स्ट लेडीच्या अटकेची माहिती दिली. दक्षिण कोरियाच्या इतिहासात प्रथमच माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी दोघेही तुरुंगात आहेत.
सिओल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने ५२ वर्षीय किम केओन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. सरकारी वकिलांनी “बेकायदेशीर कृत्यांचे” पुरावे असलेला ८४८ पानी अहवाल कोर्टात सादर केला. पुराव्याशी छेडछाड होऊ शकते या कारणावरून कोर्टाने वॉरंट दिले आणि त्यानंतर काही तासांतच अटक झाली.
किम यांच्यावर भांडवली बाजार, आर्थिक गुंतवणूक आणि राजकीय निधी कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. स्टॉक हेरफेर प्रकरणातील कथित सहभागामुळे त्या अनेक वर्षांपासून वादात होत्या. राष्ट्राध्यक्ष असताना यून यांनी विरोधक-नियंत्रित संसदेने मंजूर केलेल्या तीन विशेष तपास विधेयकांना व्हेटो दिला होता, जे किम यांच्या तपासासाठी होते. शेवटचा व्हेटो नोव्हेंबरच्या शेवटी लावण्यात आला.
यानंतर एका आठवड्यात यून यांनी मार्शल लॉ लागू केला. एप्रिलमध्ये या कृतीवरून त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला आणि पदावरून हटवण्यात आले. १० जुलैला त्यांना अटक झाली आणि तेव्हापासून ते कोठडीत आहेत. त्यानंतर जूनमध्ये देशात आकस्मिक निवडणुका घेण्यात आल्या.