जम्मू, 14 ऑगस्ट – जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिशोती परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मदत व बचावकार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.
राज्याच्या जम्मू विभागातील अनेक जिल्ह्यांत सकाळपासून जोरदार पाऊस होत होता. किश्तवाडमध्ये मुसळधार पावसादरम्यान चिशोती येथे अचानक ढगफुटी झाली आणि परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सध्या पाडर भागात सुरू असलेल्या मचैल माता यात्रेत दरवर्षी देशभरातून लाखो भाविक सहभागी होतात. येथे अनेक लंगर (भोजन शिबिरे) उभारलेले असतात. ढगफुटीमुळे काही लंगर वाहून गेले असून, एका लंगरचा तंबू आणि साहित्य पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या मते, पूरामुळे मचैल यात्रा मार्ग व काही पूल यांचेही नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले की, ढगफुटीची माहिती मिळताच बचावपथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत आणि नुकसानीचा अंदाज लवकरच घेतला जाईल. विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधला असून, सध्याच्या घडीला नुकसान किती झाले आहे याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पूरामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी बचावकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ट्विटद्वारे घटनेबाबत दुःख व्यक्त करून पीडित कुटुंबीयांना संवेदना आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच सिव्हिल, पोलिस, लष्कर, एनडीआरएफ व एसडीआरएफला बचाव आणि मदतकार्य अधिक गतीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत.