सोलापूर, 14 ऑगस्ट – सोलापूर-मुंबई-दिल्ली अशी थेट विमान सेवा सुरू करून प्रवास सुलभ करण्याची मागणी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली. या सेवेमुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा मिळेल तसेच व्यापारी व व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
नवी दिल्ली येथे झालेल्या या भेटीत मोहिते-पाटील यांच्यासोबत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे आणि हिंदकेसरी पै. योगेश दोडके उपस्थित होते.
यासोबतच, राज्यातील ज्या ठिकाणी नवीन विमानसेवा सुरू होणार आहे, त्या ठिकाणांहून तातडीच्या कामानिमित्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबई मंत्रालयात जाण्यासाठी विमान प्रवासाची परवानगी व सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली. यामुळे वेळेची बचत होऊन कामकाजात गती येईल, असे ते म्हणाले.