सोलापूर, 14 ऑगस्ट – महापालिकेच्या प्रसूतिगृहातील रुग्ण पळविण्याच्या प्रकारानंतर आणि बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार आढळलेल्या त्रुटींमुळे नवीपेठ येथील श्रेयस नर्सिंग होम तात्पुरते सील करण्यात आले. डॉ. सुमीत सुरवसे यांच्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला असून, कारवाईनंतरही त्यांनी बाळ्यात रुग्ण तपासणी सुरू ठेवली होती. तपासणीत सर्वच यंत्रणा संशयास्पद आढळल्या.
शासनमान्य गर्भलिंग तपासणीचे फलक लावले असले तरी अनधिकृत तपासणी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी करून हॉस्पिटल सील करण्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
महापालिकेच्या प्रसूतिगृहांत तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी वळविण्याचा प्रकार आशा वर्कर्सकडून होत असल्याचे उघड झाले आहे. पैशाचे आमिष दाखवून हे काम करून घेतले जात होते. याप्रकरणी श्रेयस नर्सिंग होमचे डॉ. सुमीत सुरवसे आणि डॉ. श्रद्धा सुरवसे यांच्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची नोटीस देण्यात आली होती. तपासणीत बॉम्बे नर्सिंग ॲक्ट व पीसीपीएनडीटी ॲक्टचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.