मुंबई, 14 ऑगस्ट – वारकरी, धारकरी, टाळकरी, भागवत आणि नाथ संप्रदायाचा अपमान केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सार्वजनिकपणे माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली. ते भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते.
नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रातील वारकरी, नाथ संप्रदाय आणि इतर शाकाहारी परंपरेचा अवमान करणे अयोग्य आहे. नाथ संप्रदाय पराक्रमी असून इतिहासात त्यांनी अनेक युद्धे जिंकली आहेत. राजकारण करावे पण धार्मिक परंपरांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, राऊत यांनी काही दिवसांत या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असे आव्हानही त्यांनी केले.
सामनामधील अग्रलेखावर टीका करताना बन यांनी “कु ची बाराखडी” हा शब्दप्रयोग राऊत यांच्यावर वापरत खिल्ली उडवली आणि महायुती सरकारची “विकासाची बाराखडी” मांडली. यात अटल सेतू, बीडीडी चाळ पुनर्विकास, कोस्टल रोड, धारावी पुनर्विकास, इलेक्ट्रिफिकेशन धोरण, कलानगर उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, वाढवण बंदर, एक्सप्रेस वे आणि झोपडपट्टी विकास यांचा उल्लेख केला.
पत्रा चाळ घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करताना बन यांनी राऊत यांना टीकेचे धनी ठरवले. फडणवीस सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकासातून मराठी माणसांना परवडणाऱ्या दरात मोठी घरे मिळवून दिली, तर राऊत यांच्या काळात या घरांच्या किंमती जास्त होत्या, असेही त्यांनी नमूद केले.