नवी दिल्ली, 16 ऑगस्ट – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील ‘सदैव अटल’ स्मारकस्थळी पुष्पांजली अर्पण केली. यापूर्वी त्यांनी एक्स (ट्विटर) वर लिहिलेल्या संदेशात अटलजींचे समर्पण व सेवाभाव भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. राष्ट्रपती मुर्मू यांनीही स्मारकस्थळी हजेरी लावून अटलजींना आदरांजली दिली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अटलजींनी मजबूत आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी केलेले आजीवन प्रयत्न राष्ट्र सदैव लक्षात ठेवेल. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, किरेन रिजिजू, गजेंद्रसिंह शेखावत, जदयू खासदार संजय झा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही उपस्थित राहून अटलजींना श्रद्धांजली वाहिली.
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२५ रोजी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान राहिले आणि दशकानुदशके भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले गेले. त्यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.