हैदराबाद, १८ ऑगस्ट – तेलंगणातील हैदराबादमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी अपघात झाला. रथावरील उंच रचना विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
ही घटना रामंतापूरमधील गोकुळनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मिरवणुकीत रथ अचानक बंद पडल्याने नऊ युवकांनी तो हाताने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रथावरील उंच बांधकाम थेट उच्चदाब तारेवर आदळले आणि तिव्र विजेचा धक्का बसला. धक्क्यामुळे सर्वजण दूर फेकले गेले व मिरवणुकीत गोंधळ उडाला.
घटनास्थळी पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतांमध्ये कृष्णा (२१), रुद्र विकस (३९), राजेंद्र रेड्डी (४५), श्रीकांत रेड्डी (३५) आणि सुरेश यादव (३४) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे अंगरक्षक श्रीनिवास यांचाही समावेश आहे.
मृतदेहांना सरकारी गांधी रुग्णालय, सिकंदराबाद येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेबद्दल विविध पक्षांच्या नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व जखमींना उत्तम उपचार देण्याची मागणी केली आहे.