नागपूर, १८ ऑगस्ट – मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा आणि पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतात पाणी शिरले असून हाताशी आलेले पीक वाहून गेले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
ज्वारी, कपाशी आणि सोयाबीनसह पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये हजारो एकरवरील पिके उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले.
गेल्या अतिवृष्टीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, त्यात पुन्हा यंदा पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने तात्काळ मदत देण्यासाठी गरज भासल्यास अजून कर्ज काढावे, पण शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे ते म्हणाले.
राज्यातील शिवभोजन थाळी योजनेचे सात महिन्यांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. गरीबांसाठी असलेली ही योजना सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यांनी या योजनेत परिश्रम घेतले, त्यांना पैसे न दिल्यामुळे आत्महत्या करायची वेळ येते आहे का, असे वडेट्टीवार यांनी विचारले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्याची तिजोरी खाली झाल्याचा आरोप केला. निराधार योजना, कंत्राटदारांचे पैसे आणि आमदार निधी यावरही सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले.
देशात मतचोरी होत असल्याचा आरोप करताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुरावे दिल्यानंतरही निवडणूक आयोगाने योग्य उत्तरे दिली नाहीत. महाराष्ट्रातील निवडणुकांचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करून दिले गेले नाही. आयोग स्वायत्त राहिला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न योग्य आहेत, त्यावर ते माफी मागणार नाहीत,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.